शहरात रस्त्यांची शोधाशोध

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक शहरात सिंहस्थ कामांमुळे रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. बाजारपेठा आणि गल्लीबोळांतही वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक पोलीस कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच वाहतूक सुरक्षेसाठी स्वतंत्र उपायुक्त नेमले जाण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक नियोजन सुलभ होईल.

causes and solutions for traffic congestion on nashik roads

सिंहस्थ कामांसाठी शहरात सुरू असलेल्या खोदकामांमुळे प्रमुख रस्त्यांपाठोपाठ आता बाजारपेठेसह गल्लीबोळांतही वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना वाहने चालवण्यापूर्वी योग्य रस्त्याचा शोध घ्यावा लागत आहे. त्यातच बेशिस्त रिक्षा, सिटीलिंक बस आणि वाहन चालकांकडे पोलिसांची डोळेझाक होत असल्याने कोंडीत भर पडत आहे. गंभीर बाब म्हणजे, बऱ्याच ठिकाणी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ही गप्पांत व्यस्त राहत असल्याने नागरिक त्रासले आहेत.

कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन आणि सुरक्षेचे नियोजन केले असून, अंमलदारांना 'फिक्स पॉइंट'वर नेमले आहे. यासह अचानक गर्दी व कोंडी होणाऱ्या ठिकाणी त्वरित मदतीसाठी 'झेब्रा' पथकांची तजवीज केली आहे. त्यामध्ये काही अधिकारी व अंमलदार राखीव ठेवल्याने त्वरित कोंडी फोडण्यास मदत होत आहे. काही ठिकाणी अचानक कोंडी उद्भवत असल्याने तेथे व इतर चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना पाचारण केले आहे. प्रमुख चौकांसह गल्लीबोळांतून प्रमुख रस्त्यांना जोडल्या जाणाऱ्या ठिकाणी ‘झेब्रा’ पथकाला नेमण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

लवकरच स्वतंत्र उपायुक्त

शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांत सुरू असलेल्या खोदकामांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना वाहतूक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. शहरात सध्या दोन परिमंडळ, गुन्हे आणि मुख्यालय असे चार उपायुक्त कार्यरत आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन सोयीस्कर होण्यासाठी स्वतंत्र उपायुक्त नेमण्याची शक्यता आहे. लवकरच वाढीव पोलिस उपायुक्त नियुक्तीचे आदेश जारी होण्याची चिन्हे आहेत.