Crpf Officer Suspended Young Woman Arrested In Murder Case
सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी निलंबित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ( सीआरपीएफ ) उपमहानिरीक्षक बी. सी. पात्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. अलीकडेच मंजूर झालेल्या ‘सीएपीएफ‘ विधेयकाचा विरोध करणारे संदेश सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पात्रा हे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बरोबरीने पदोन्नती आणि सेवा हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढणारे मुख्य याचिकाकर्ते आहेत. सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र, माजी निमलष्करी संघटनांनी ही कारवाई 'दुर्भावनेने' प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
सिंहाचा बछाडा मृतावस्थेत जुनागड : गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील रबारी नेस भागात सात ते आठ महिने वयाचा सिंहाचा बछाडा मृत अवस्थेत आढळला. बछाड्याच्या शरीरावर गंभीर जखमा असून, एखाद्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला. या प्रकरणातील संशयित स्थानिक रहिवासी सध्या फरार असून, त्याचा मोबाइल बंद आहे. वनविभागाने आणि पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सक्करबाग प्राणीसंग्रहालयात तीन पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे बछाड्याचे शवविच्छेदन केले जात आहे.
सुरक्षा दलांचा सराव
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आगामी मान्सून आणि वार्षिक बुद्ध अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दले आणि नागरी संस्थांची सज्जता तपासण्यासाठी एक संयुक्त मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. पूंछ शहराच्या एस. के. ब्रिज भागात झालेल्या या सरावामध्ये अचानक येणारा पूर, अपघात आणि आपत्तीच्या परिस्थितीचा सामना करण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली.
तरुणीला अटक
बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये आपल्या आई-वडील आणि लहान बहिणीची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या २५ वर्षीय श्वेता नावाच्या तरुणीला पुदुचेरीमधून अटक करण्यात आली आहे. श्वेताने तिचा प्रियकर केनेथच्या मदतीने ही तिहेरी हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्री सीगेहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमसुंदर, त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी आणि मुलगी सुप्रिया यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. श्वेता आणि केनेथच्या प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध होता. त्या वादातून हे हत्याकांड घडले.