शहरात मान्सून आला रे...

महाराष्ट्र टाइम्स
शहरात मान्सून आला रे...
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मान्सूनने अखेर संपूर्ण विदर्भ व्यापला असून नागपूरसह सर्व जिल्हे आता अधिकृतपणे मान्सूनच्या प्रभावाखाली आले आहेत.

मंगळवारी विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने अवघ्या २४ तासांत उर्वरित भागही व्यापत मध्य प्रदेशातही प्रवेश केला आहे. मंगळवारपर्यंत नागपुरात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. मात्र, बुधवारी हवामान विभागाने नागपुरातही मान्सून पोहोचल्याचे जाहीर केले.
मान्सूनच्या आगमनानंतर तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. नागपुरातील कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअसवर आले असून ते सरासरीपेक्षा १.५ अंशांनी कमी नोंदविण्यात आले. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्येही तापमानात घसरण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. बुधवारी सकाळपासूनच नागपूरसह अनेक भागांत आकाशात ढगांची गर्दी होती.

दिवसभर वातावरणात आर्द्रता कायम राहिली. संध्याकाळनंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि काही इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ जूनपर्यंत विदर्भात सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. सध्या तरी अतिवृष्टीचा इशारा नसला, तरी मान्सून सक्रिय राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब मानली जात आहे.