Political Controversy Over Bhagwant Manns Fake Video
मान यांच्या व्हिडीओवरून पुन्हा वादंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कथित व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात मान यांना ‘अकाल तख्त’ने आधीच दोषी ठरवले असताना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बनावट अहवालासाठी आम आदमी पक्ष आणि मान यांनी कट रचल्याचा आरोप भाजपने केला. मात्र, या व्हिडीओप्रकरणी ‘क्लीन चिट’ देणारा हा अहवाल बनावट असल्याचा आरोप मान यांनी बुधवारी फेटाळून, आपल्या बदनामीसाठी सर्व विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याचा दावा केला.
‘गेल्या काही दिवसांपासून माझे बनावट व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहेत. विरोधकांना माझ्याविरोधात काही सापडत नाही तेव्हा ते धार्मिक मुद्द्यावरून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात’, अशा शब्दांत मान यांनी काँग्रेस, भाजप आणि अकाली दल यांना लक्ष्य केले. ‘त्या आक्षेपार्ह व्हिडीओतील व्यक्ती म्हणजे मी नव्हे. व्हिडीओतील व्यक्तीची उंची आणि शरीरचनाही आपल्याशी जुळत नाही. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल करून मला दोषी ठरवण्यात आले’ असे मान यांनी म्हटले आहे. गुरुग्राम पोलिसांच्या कारवाईचा उल्लेख करीत मुख्यमंत्री मान यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या मालकांना भाजप लक्ष्य करीत असून, काँग्रेस आणि अकाली दलही त्यास पाठबळ देत असल्याचा आरोप केला. प्रयोगशाळेच्या मालकांना गुन्हा नोंदवण्याची धमकी देऊन आणि त्यांचा छळ करून, ‘बनावट’ अहवाल देण्यासाठी पैसे मिळाल्याचा जबाब भाजपला हवा आहे’, असा आरोपही मान यांनी केला. मात्र, अकाली तख्तच्या कारवाईपासून वाचण्यासाठी व्हिडीओप्रकरणी बनावट अहवालासाठी पंजाब पोलिस अधिकारी आणि खासगी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे साटेलोटे झाले आहे, असा आरोप दिल्लीचे मंत्री व भाजप नेते मजिंदर सिंग सिरसा यांनी केला. मान यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालावा, अशी मागणी काँग्रेसने केली.