‘सीजेपी’ला खाप पंचायतींचा पाठिंबा

महाराष्ट्र टाइम्स
support for cjp from khap panchayats struggle for rights
नीट-यूजी पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला देशातील खाप पंचायतींचा पाठिंबा मिळाला आहे. येत्या रविवारी विविध खाप पंचायतींचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पक्षाचे ( सीजेपी ) संस्थापक अभिजीत दीपके यांनी बुधवारी दिली. सीजेपीचे आंदोलन बुधवारी, सलग पाचव्या दिवशीही सुरू होते.

यापूर्वी शेतकरी संघटनांतील चढूनी गटाने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, या संघटनांच्या कार्यकर्त्यांना जंतर-मंतर परिसरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली. ‘ज्यांचे हात १७ हून अधिक विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशा प्रधान यांच्यासारख्या व्यक्तीकडून आम्हाला देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. न्याय आणि उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व तरुणांना दहशतवादी संबोधणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकरी, डॉक्टर, तरुण हे सारे दहशतवादी असतील, तर मग भारतीय कोण आहे?’ असा सवाल दीपके यांनी केला.