अणुनिरीक्षणाबाबत संभ्रम कायम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
confusion over nuclear inspections in iran
संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेचे निरीक्षक इराण मधील अणुसंवर्धन ठिकाणांना भेट देतील, असे संस्थेच्या प्रमुखांनी स्पष्ट केले. परंतु इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काजेम गरीबाबादी यांनी यांनी हे विधान फेटाळले. ‘असे निरीक्षण केवळ अमेरिका आणि इराणमधील अंतिम करारानंतरच शक्य आहे,’ असे त्यांनी अधोरेखित केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने झालेल्या अंतरिम कराराचा हे निरीक्षण एक महत्त्वाचा भाग आहे.

सन २०२५मध्ये इस्रायलने इराणविरुद्ध १२ दिवसांचे युद्ध पुकारल्यापासून, इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला ( आयएईए ) युरेनियम संवर्धित ठिकाणांना भेट देण्यापासून रोखले आहे. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात उच्च संवर्धित युरेनियमची साठवणूक केल्याचा अंदाज आहे. ‘ग्रॉसी यांनी विनंती करूनही स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. तसेच, ज्या अणु सुविधांवर हल्ले झाले किंवा जिथे अणुसामग्री आहे, तिथे प्रवेश देण्याची कोणतीही योजना नाही,’ असे गरिबाबादी यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. या ठिकाणांचे निरीक्षण करण्यावरून अमेरिका आणि इराणने परस्परविरोधी विधाने केल्यानंतर ‘आयएईए’चे प्रमुख राफेल मारियानो ग्रॉसी यांनी हे आताच्या घडीचे शाब्दिक युद्ध असल्याचे म्हटले आहे.
‘मी राजकीय विधाने समजू शकतो. ती वास्तवाचाच एक भाग आहेत, परंतु दोन्ही देशांच्या अध्यक्षांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अणु साहित्य आणि अणुकेंद्रांसंबंधी सर्व घडामोडींवरील देखरेख ठेवण्याचे काम आयएईए करेल, असे त्या करारात स्पष्ट केले आहे,’ असे त्यांनी नमूद केले. ‘यासाठी आम्हाला तेथे जाऊन निरीक्षण करावे लागेल. हे एक दिवसानंतर, आठवड्यानंतर किंवा दहा दिवसांनंतर होईल, पण होईल,’ असेही ते म्हणाले. त्सुनामीचा तडाखा बसलेल्या फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, स्वित्झर्लंडमधील बर्गनस्टॉक रिसॉर्ट येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील तांत्रिक पातळीवरील चर्चा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले.

खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोदींना निमंत्रण

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी निमंत्रित केल्याचे समजते. राजनैतिक सूत्रांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. ५ ते ९ जुलै या कालावधीत अंत्यविधी होणार आहेत. मोदी यांना दिलेल्या निमंत्रणाबाबत सरकारकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

अमेरिकी सिनेटमध्ये

युद्धविरोधी ठराव मंजूर

वॉशिंग्टन : इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या लष्करी कारवाईला रोखण्याच्या उद्देशाने युद्ध अधिकारासंबंधी ठराव अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने प्रथमच मंजूर केला. युद्ध समाप्त करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर अमेरिकेचे लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत. हे युद्ध सुरू करण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतला होता. परंतु, आता त्यांना संसदेकडून निधीची आवश्यकता आहे. सिनेटने युद्ध रोखण्यासाठी दहाव्यांदा प्रयत्न केला आहे. या ठरावाच्या बाजूने ५०, तसेच विरोधात ४८ मते पडली. ट्रम्प यांनी यावर नाराजी दर्शवली आहे. ‘हे मतदान चुकीच्या वेळी करण्यात आले. ते निरर्थक आहे. यामुळे इराणला मदत आणि समर्थन मिळेल,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

दुबई : इराणमध्ये सुरक्षा परिस्थितीत सुधारणा झाली असली, तरी पुढील सूचना येईपर्यंत तेथे अनावश्यक प्रवास करण्याचे टाळा, असा सल्ला भारताने बुधवारी नागरिकांना दिला. ‘इराणमधील सद्यस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. सध्याच्या सकारात्मक घडामोडी, एकूणच परिस्थितीतील सुधारणा पाहता सुधारित प्रवास मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहोत,’ असे इराण येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.