शालेय साहित्य खरेदीसाठी झुंबड

महाराष्ट्र टाइम्स

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. शालेय साहित्याच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वह्या, दप्तर, बूट, गणवेश आणि लेखन साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक आणि छपाई खर्चामुळे दरवाढ झाली आहे. काही शाळांकडून थेट साहित्य उपलब्ध होत असल्याने बाजारातील विक्रीवर परिणाम होत आहे.

शालेय साहित्य खरेदीसाठी झुंबड
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत असल्याने रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी झाली. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि छपाई खर्चामुळे यंदा शालेय साहित्याच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे.

रविवारी सकाळपासूनच मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ तसेच उपनगरांतील स्टेशनरी आणि गणवेश विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी वर्दळ होती. अनेक पालक मुलांच्या पसंतीनुसार कार्टून, निसर्गचित्रे, प्राणी-पक्षी तसेच लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांच्या छायाचित्रांनी सजलेल्या बहुरंगी वह्या, आकर्षक दप्तर आणि आधुनिक डिझाइनचे शालेय साहित्य खरेदी करताना दिसून आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत वह्या, दप्तर, बूट, गणवेश आणि लेखन साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

काही शाळांकडून विद्यार्थ्यांना वह्या किंवा शालेय साहित्य थेट उपलब्ध करून दिले जात असल्याने खुल्या बाजारातील विक्रीवर परिणाम होत असल्याचे स्टेशनरी व्यावसायिक सांगत आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावत असताना त्याचा आर्थिक भार मात्र सर्वसामान्य कुटुंबांवर वाढत असल्याचे चित्र शालेय साहित्याच्या खरेदीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारात गतवर्षी ८० ते १२० रुपयांना मिळणारे कंपास बॉक्स यंदा ९० ते १३० रुपयांनी विक्री होत आहे. याचबरोबर १२०० ते १८०० रुपयांना मिळणारे स्कूल ड्रेस आता १६०० ते २५०० रुपयांवर गेले आहेत. तसेच, ३० ते ४५ रुपयांना मिळणारी वही ३५ ते ५० रुपये तर १० रुपयांचा पेन १२ रुपयांना मिळत आहे.

शालेय साहित्याच्या दरवाढीमागे कच्च्या कागदाच्या वाढलेल्या किमती, छपाई खर्च आणि वाहतूक खर्च हे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वह्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किरकोळ विक्रीदरही वाढले आहेत. याशिवाय नव्या डिझाइनच्या वह्या, ब्रँडेड दप्तर आणि आकर्षक शालेय साहित्याची मागणी वाढल्याने पालकांच्या खर्चातही भर पडत आहे.

शाळांमधूनच वह्यांची सक्ती;

स्टेशनरी विक्रेते चिंतेत

अनेक खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठरावीक वह्या किंवा संपूर्ण शालेय साहित्याचे संच उपलब्ध करून दिले जात असल्याने खुल्या बाजारातील विक्रीवर परिणाम होत आहे. कंपनीकडून वह्यांचे दर नियंत्रित असले तरी प्रत्येक वहीमागे वाहतूक आणि वितरणाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याचे स्टेशनरी व्यावसायिक सांगतात. शाळास्तरावर होणाऱ्या थेट पुरवठ्यामुळे पारंपरिक स्टेशनरी व्यवसायावर दबाव वाढला आहे.