नाशिक महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आज, सोमवारी (१५) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. शाळांचा पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी मनपा शिक्षण विभागाच्या वतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आयुक्त मनीषा खत्रींसह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह सर्व अधिकारी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
खासगी शाळांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी महापालिका शाळांच्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक घेत सूचना दिल्या. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय अधिकाऱ्यांसह महत्त्वाचे अधिकारी प्रत्येक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
आचारसंहितेचे काटेकोर पालन
सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीचा विचार करता, सर्व शाळांमध्ये शासकीय नियमांचे आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आचारसंहितेच्या चौकटीत राहूनच सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, याची संपूर्ण दक्षता मनपा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
बैलगाडीतून मिरवणूक
नवीन प्रवेश घेणाऱ्या चिमुरड्यांची गावात/परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण होईल. शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊल ठेवताच प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प देऊन आपुलकीने त्यांचे स्वागत केले जाईल. तसेच, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.





