पुलावर वाढदिवस साजरा करणे महागात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
celebrating a birthday on a bridge in guwahati comes at a high cost
गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलावर पत्नीचा वाढदिवस साजरा करून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल आणि उपद्रव निर्माण केल्याबद्दल आसाम पोलिसांनी स्थानिक व्यावसायिक, त्याची पत्नी आणि आणि इतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे भारलुमुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्दियावर ‘चेकपोस्ट’
हल्दिया : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदराला ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे हे बंदर भारतातील ४१ वे समुद्री इमिग्रेशन केंद्र बनले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आणि मालवाहू जहाजांच्या कर्मचाऱ्यांची कायदेशीर तपासणी करणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मंत्रालयाने ३४ सागरी आणि नदी बंदरांना इमिग्रेशन बंदरे म्हणून घोषित केले होते.

कुटुंबीयांना भरपाई

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तमिळनाडूतील तिरुवल्लूर येथील अमोनिया गॅस गळतीत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधीची रक्कम १० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. २१ जून रोजी तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका खासगी सी-फूड प्रक्रिया आणि निर्यात केंद्रात झालेल्या अमोनिया गॅस गळतीमध्ये ओडिशातील सहा जणांचा मृत्यू झाला होता.

पाककडून भरपाई

पेशावर : खैबर पख्तूनख्वा सरकारकडून मर्दानमधील गुरुद्वारासाठी चार कोटी रुपये आणि हत्या झालेल्या शीख दाम्पत्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. खैबर पख्तूनख्वाचे धार्मिक आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री साहिबजादा अदनान कादरी यांनी सोमवारी मर्दान जिल्ह्यातील गुरुद्वाराला भेट दिली. या वेळी त्यांनी या हत्येचा निषेध करीत शीख समुदायाप्रती सहवेदना व्यक्त केली.

रुग्णालयावर हल्ला

चंडीगड : पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात होमिओपॅथिक डॉक्टर असलेल्या आणि स्थानिक भाजप नेत्याच्या दवाखान्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल बॉम्ब फेकले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तरसेम गर्ग हे भाजप नेते असून, भटिंडा येथील मेला राम रोडवर क्लिनिक चालवतात. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच ‘आप’मधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जामीनासाठी धाव

नवी दिल्ली : गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी श्यामकानू महंत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आसाम सरकारकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज फेटाळण्याच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या २९ मे रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महंत यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

लडाखमध्ये आंदोलन

लेह : लेह अपेक्स बॉडी (एलएबी) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) यांनी पुकारलेल्या बंदमुळे मंगळवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमधील जनजीवन विस्कळित झाले, तर केंद्राशी ‘विश्वासार्ह संवाद’ घडवून आणण्यासाठी दबाव टाकण्याकरिता हजारो नागरिकांनी येथील रॅलीत सहभाग घेतला.