Five Lakh Trees Cut For Highway Construction In Twelve Years
बारा वर्षांत पाच लाख वृक्षतोड
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
राज्यात विविध द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांच्या बांधकामासाठी तसेच रुंदीकरणासाठी गेल्या १२ वर्षांत ५.३० लाख झाडे तोडण्यात आल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे लेखी उत्तर देण्यात आले आहे. परंतु, महामार्गाच्या दुतर्फा, कंत्राटदारामार्फत, शासकीय विभागामार्फत त्या बदल्यात ५१.१० लाख झाडांची लागवड करण्यात आल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महामार्गांच्या बांधकामादरम्यान होणाऱ्या झाडांची कत्तल आणि त्याबदल्यात अल्प प्रमाणात झाडांची लागवड करण्यात येत असल्याबाबतचे प्रश्न सदस्य जगताप यांनी उपस्थित केला होता. पर्यावरण आणि रस्ते रुंदीकरण यांचा समतोल राखला जात असल्याचीही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांच्या बांधकामासाठी तसेच रुंदीकरणासाठी गेल्या १२ वर्षांत ५.३० लाख झाडे तोडण्यात आल्याची कबुली विभागाने दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या ७०१.३७९ किमी लांबीच्या महामार्गाच्या मध्यभागी दुतर्फा प्रतिकिमी १६६६ वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. त्या अनुषंगाने रस्त्याच्या एकूण लांबीत २२ लाख वृक्षांची लागवड केली आहे, असेही उत्तरात म्हटले आहे.