‘एनडीए’चे संख्याबळ वाढवणार

महाराष्ट्र टाइम्स
‘एनडीए’चे संख्याबळ वाढवणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
संसदेचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असून, त्यात मतदारसंघ फेररचनेचे महत्वाकांक्षी घटनादुरूस्ती विधेयक केंद्र सरकार पुन्हा मांडणार हे अलीकडच्या विविध पक्षांतील फुटीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, यावेळी सरकार कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्षापाठोपाठ आणखी काही पक्षांतील खासदार लवकरच फुटावेत यासाठी हालचाली दिल्लीत गतिमान झाल्या आहेत.

पावसाळी अधिवेशन २० किंवा २१ जुलैच्या आसपास सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. मात्र, त्यापूर्वीच लोकसभेत ‘ एनडीए ’चे संख्याबळ आणखी वाढवण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत. या लोकसभेत २४० सदस्यांचा भाजप अल्पमतात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष व ३७ खासदारांचे दणदणीत बळ असलेला समाजवादी पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) आठपैकी जास्तीत जास्त खासदारांशी सरकारच्या वतीने गुप्तपणे संपर्क सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी शप गटाचे पाच खासदार एनडीएला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपमधून केला जातो. मात्र त्याची कोणत्याही कोनातून पुष्टी भाजपच्या गोटातून मिळत नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांचे पुत्र, खासदार पार्थ पवार यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुसरी फूट पडल्याच्या चर्चांना दिल्लीतील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. द्रमुकचे खासदार विधेयकावरील मतदानावेळी गैरहजर राहतील किंवा सभात्याग करतील याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.