वर्षभरात १० हजारांवर सायबर गुन्हे

महाराष्ट्र टाइम्स
over 10000 cyber crimes information on security project
राज्यात मागील काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारी वाढत असून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत राज्यभरात १० हजार ५०५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत २३७९ आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्य सरकारने महापे येथे ‘ महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प ’ कार्यान्वित केल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार काशीनाथ दाते, अबू आझमी, विक्रम पाचपुते यांच्यासह अन्य आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबई शहरात २०२५मध्ये सायबर आर्थिक फसवणुकीसंदर्भातील ४८२५ गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणांमध्ये १४१० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यांत १०३१ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यापैकी ११० कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यापासून रोखण्यात यश आले.

नागपूर शहरात जानेवारी २०२६ ते मे २०२६पर्यंत सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुण्यात याच कालावधीत सायबर आर्थिक फसवणुकीचे एकूण ५३६ गुन्हे दाखल झाले असून फसवणूक झालेली रक्कम दोन कोटी रुपये आहे, असे फडणवीस यांनी उत्तरात नमूद केले.

मोठ्या प्रमाणात जनजागृती

सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाची तसेच १९३० या हेल्पलाइनची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.