लंडनमधील ‘नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी’ने ( एनपीजी ) ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यावर टीका करणारी एक समकालीन कलाकृती हटवली आहे. या कलाकृतीत १९४३च्या बंगाल दुष्काळाचा संदर्भ देऊन चर्चिल यांनी ब्रिटिश राजवटीखाली भारतीयांना जाणीवपूर्वक उपाशी ठेवले, असा दावा करण्यात आला होता.
वादाची सुरुवात कुठून?या वादाची सुरुवात सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या ‘आर्टिस्ट्स फर्स्ट: कंटेंपररी परस्पेक्टिव्ह्ज ऑन पोर्ट्रेटचर’ या तात्पुरत्या प्रदर्शनातून झाली. यात सन २०१९चे टर्नर पुरस्कार विजेते ब्रिटिश कलाकार हेलन कॅमॉक यांनी ‘पर्सिस्टन्स’ हा ४० मिनिटांचा चित्रपट सादर केला होता. सुमारे दहा महिने हा चित्रपट कोणत्याही वादाशिवाय दाखवला जात होता. मात्र, चित्रपटातील एका विशिष्ट वाक्याकडे लक्ष गेल्यावर परिस्थिती बदलली. आयर्लंडमधील ऑलिव्हर क्रॉमवेल यांच्या लष्करी मोहिमांवर भाष्य करताना कॅमॉक यांनी, क्रॉमवेल यांचे कृत्य हे ‘विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय लोकसंख्येला जाणीवपूर्वक उपाशी ठेवण्यासारखेच होते’, असे विधान केले.
चर्चिल यांच्या नातवाचा पुढाकार
टीकाकारांचा आक्षेप ‘जाणीवपूर्वक’ या शब्दावर होता. त्यांच्या मते, यावरून चर्चिल यांनी भारतीयांविरुद्ध उपासमारीचा शस्त्र म्हणून हेतुपुरस्सर वापर केला असा चुकीचा अर्थ निघतो. चर्चिल समर्थकांचा युक्तिवाद आहे, की बंगालचा दुष्काळ हा जपानी आक्रमण, प्रशासकीय अपयश यांमुळे पडला होता, त्यात चर्चिल यांचा कोणताही हेतू नव्हता. या कलाकृतीवरील आरोपांना घृणास्पद ठरवून ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’च्या ५० हून अधिक सदस्यांनी, चर्चिल यांचे नातू निकोलस सोम्स यांनी या विरोधाला पाठिंबा दिला. अखेर गॅलरीने कलाकृती काढून टाकली.