11 year old Girl Raped And Murdered In Delhi Suspect Arrested
११ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
फूटपाथवर आपल्या कुटुंबासोबत झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच; नंतर तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजधानी दिल्लीत समोर आली आहे. आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी पीडित मुलीचा मृतदेह वनक्षेत्रात फेकून दिला होता. मात्र, सहा तासांच्या आतच त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात ही या संतापजनक घटना घडली. फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबाला सोमवारी पहाटेच्या सुमारास ही मुलगी सोबत नसल्याचे आढळले. तिचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार तपास पथके घटनास्थळी पोहोचली व त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.‘आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असलेला ३० ते ३२ वयोगटातील कॅबचालक आहे. पीडित मुलगी कुटुंबासोबत झोपलेली असताना त्याने पहाटे पाचच्या सुमारास तिचे अपहरण केले. सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तत्काळ शोधमोहीम राबवण्यात आली.
त्यासाठी २० पथके तयार करण्यात आली होती’, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच ठिकाणी परत येत होता; परंतु पोलिसांची पथके पाहून तो पळून गेला.