New Method To Prevent Wildfires Using Australian Technology
‘वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन पद्धत’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : जंगलात लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी ऑस्ट्रेलियात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या चार अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्याचा मानस आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
आमदार भास्कर जाधव यांनी मांडलेल्या लक्षवेधी चर्चेत सदस्य शेखर निकम, दिलीप लांडे, सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते. नाईक म्हणाले, ‘राज्यातील जंगलांमध्ये वणवा लागू नये यासाठी; तसेच राज्यातील वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी वन विभाग सातत्याने कार्यरत आहे. वन विभागाच्या या कामात जनसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा असून, यासाठीच्या जनजागृतीमध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा. तर राज्यातील खासगी मालकी असणाऱ्या जागेत लागणारा वणवा, यामुळे होणारे नुकसान, त्याबाबतची भरपाई या संदर्भात संबंधित विभाग व मंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल.’