तार्तान आर्मी अर्थात जोरजोरात आरोळ्या देऊन स्कॉटलंड संघाला प्रोत्साहित करणारे चाहते हा जणू संघाचाच भाग. या आर्मीने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे झालेल्या लढतीत आपल्या संघाला दिलेले प्रोत्साहन एक क्षण थांबवले नाही. स्कॉटलंडने तीन तपानंतर फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवताना हैतीचा ३-१ असा पराभव केला आणि ब्राझीलचा समावेश असलेल्या ‘सी’ गटात आघाडी घेतली.
ब्राझील आणि मोरोक्को या गटातील प्रबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यापूर्वी स्कॉटलंडला विजयाचे गुण हवे होते. जॉन मॅकगिन याने २८व्या मिनिटांस छान संधी साधत स्कॉटलंडचे हे गुण निश्चित केले. चे अॅडम्सचा गोलचा प्रयत्न गोलरक्षक जॉनी प्लॅसाईडने निष्प्रभ ठरवला. मात्र मॅकगिनने संधी साधली होती. स्कॉटलंडचा यापूर्वीचा वर्ल्ड कप स्पर्धेतील विजय १९९०मध्ये स्वीडनविरुद्ध (२-१) होता.
हैतीला पेनल्टी नाकारली?
या सामन्यात हैतीला पेनल्टी नाकारल्याचा आक्षेप घेतला जात आहे. हैतीच्या जीन-रिकनर बेल्लेग्रेड याच्या किकवर चेंडू स्कॉलंडचा बचावपटू ग्रँट हॅन्ली याच्या हाताला पेनल्टी क्षेत्रात लागल्याचा आरोप हैतीने केला. मात्र रेफरींनी अपील फेटाळले. त्यांनी व्हिडिओ असिस्टंट रेफरींची मदत घेणेही टाळले. काही मिनिटांपूर्वीही हॅन्लीच्या हाताला चेंडू लागल्यानंतरही रेफरींनी वारची मदत घेतली नव्हती, याकडेही एक्सवरुन लक्ष वेधले जात आहे. स्कॉटलंडचा मध्यरक्षक केनी मॅकलीन याचा बूट हैतीच्या खेळाडूच्या गुडघ्याच्या वरच्या भागात लागल्यावरही त्याला पिवळे कार्डच दाखवले गेले असाही दावा होत आहे.




