चेंबर फुटल्याने सांडपाणी नासर्डीत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक शहरात अनेक समस्यांनी नागरिकांना त्रस्त केले आहे. सातपूरमध्ये ड्रेनेज चेंबर फुटल्याने सांडपाणी नदीत मिसळत आहे. अशोकनगरमध्ये जलवाहिनी आणि ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीअभावी वाहतूक कोंडी होत आहे. सिडकोमध्ये जॉगिंग ट्रॅकवर अंधार असून पथदिवे बंद आहेत. मोकाट श्वानांचा उपद्रवही वाढला आहे. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

चेंबर फुटल्याने सांडपाणी नासर्डीत

सातपूर : खोदकामामुळे त्र्यंबकरोडवरील समृद्धनगरच्या वळणावर नैसर्गिक नाल्याच्या बाजूला मुख्य ड्रेनेज चेंबर फुटले असून, सांडपाणी नैसर्गिक नाल्याद्वारे नासर्डी नदीत मिसळत आहे. अशोकनगरच्या मुख्य रस्त्यालगतही जलवाहिनी व ड्रेनेज चेंबरचे नुकसान झाले होते. जलवाहिनीची दुरुस्ती ठेकेदाराने केली, परंतु ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याने अशोकनगरच्या भाजी मंडईकडे वळण घेताना रोजच वाहतूक कोंडीचा सामना वाहन करावा लागतो. ठेकेदाराने चेंबर दुरुस्त करून देण्याची मागणी होत आहे.

जलवाहिनीला गळती

सातपूर : शनिवारी सावरकरनगर येथील महिला उद्योग भवन व आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर जलवाहिनीला गळती लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गळती लागलेल्या ठिकाणी शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा गळती बंद करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

जॉगिंग ट्रॅकवर अंधार

सिडको : प्रभाग क्रमांक २७ मधील राजे संभाजी स्टेडियम परिसरातील जॉगिंग ट्रॅकवरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात चाचपडावे लागते. त्यातच ट्रॅकलगतच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रकाश आणखी कमी होत असून, व्यायामप्रेमी व पायी चालणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांना जॉगिंग ट्रॅकवर चालताना मोबाइलच्या टॉर्चचा आधार घ्यावा लागत आहे. बंद पथदिवे तातडीने सुरू करून परिसरातील झाडांची छाटणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

थॅलेसेमिया स्क्रीनिंग

सिडको : नाशिक जिल्हा थॅलेसेमियामुक्त करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब, जनकल्याण रक्त केंद्र आणि श्वास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत थॅलेसेमिया स्क्रीनिंग अभियान राबविण्यात येत आहे. वावरेनगर येथील आरोग्यम पॅथलॅबमध्ये दररोज सकाळी ८ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १८ ते ३० वयोगटातील अविवाहित युवक-युवती तसेच गरोदर महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘सीएनजी’साठी रांगा

सातपूर : अधिक मास महिना असल्याने त्र्यंबकेश्वरला देशभरातून भाविक येतात. सध्या मुबलक सीएनजी उपलब्ध असला, तरी नाशिक- त्र्यंबकेश्वररोडवरील पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच बाहेरून आलेल्या भाविकांच्या वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत.

रिक्षाचोरास अटक

पंचवटी : आडगावला एका हॉटेलात जेवण करण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाची रिक्षा चोरणाऱ्या आकाश जनार्दन सांबरे (रा. कोणार्कनगर) यास आडगाव पोलिसांनी अटक केली. ॲलेक्स पॉल्सन कसबे हा रिक्षा चालक रात्री कुटुंबातील सदस्यांना घेऊन नांदूर जत्रा लिंकरोडला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी संशयित सांबरे याने कसबे यांची १ लाख ४० हजार रुपये किमतीची रिक्षा (क्र. एमएच १५, एफयू- ०५३९) चोरून नेली होती.

मोकाट श्वानांचा उपद्रव

सिडको : येथील उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, कामटवाडे, जुने सिडको, साईग्राम नगर, इंदिरानगर आदी भागांमध्ये मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट श्वानांना पकडून बंदिस्त करावे, त्यांचे निर्बीजीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.