रतामधील कोणत्याही फुटबॉल फॅनला विचारले, की तुम्हाला रियल माद्रिद आणि बार्सिलोना हे क्लब ठाऊक आहेत का? आणि या जगप्रसिद्ध क्लबच्या स्टेडियममध्ये जाऊन एखादा सामना पाहण्यास तुम्हाला आवडेल का, तर त्यांचे अति-उच्चरवामध्ये ‘हो’ असेच उत्तर येईल!
बॉलिवूडमधील चित्रपटांमधील दर्शनामुळे स्पेनचे भारतीय ‘जेन झी’मध्ये आकर्षण आहे; पण अशी काय जादू आहे स्पॅनिश फुटबॉलमध्ये, की क्रिकेटवेड्या भारतामध्येही त्याची भुरळ पडावी?
घटक १ - स्पेनमधील यशस्वी क्लब फुटबॉल व्यवस्था आणि त्याचे जगभर केले जाणारे बिझिनेस केंद्रित मार्केटिंग.
इंग्लिश प्रीमियर लीग ही सर्वार्थाने जगभरात ‘प्रीमियर’च आहे. त्या खालोखाल स्पॅनिश फुटबॉल लीगचा ( ला लिगा ) क्रमांक आहे. युरोपपासून ते अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडामध्ये स्पॅनिश बोलली जाते. त्याच्याच जोडीला शहर आधारित क्लब व्यवस्थेमध्ये रियल माद्रिद, बार्सिलोना हे क्लब अक्षरशः जगाच्या कानाकोपऱ्यात फुटबॉलसह आघाडीचे ब्रँड म्हणून विकसित करण्यात आले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून आमच्या स्पेन दौऱ्यादरम्यान माद्रिद, बार्सिलोनात फुटबॉलची क्रेझ किती असते, याचा याचि देही याचि डोळा अनुभव घेतो. त्याच्याच जोडीला ला-लिगा बिझिनेस स्कूलमधील तज्ज्ञ प्राध्यापक या स्पॅनिश फुटबॉलची ग्लोबल मार्केटिंग धोरणे समजावून सांगतात.
घटक २ - लहान वयातील खेळाडूंना हेरून त्यांना प्रशिक्षण देत जागतिक दर्जाचे खेळाडू करण्याची ‘ग्रासरूट’ व्यवस्था. देशोदेशीचे खेळाडू स्पेनमध्ये घडतात. मेस्सीसारखी अनेक उदाहरणे आहेत. स्पेनमधील फुटबॉल कौशल्यालादेखील या व्यवस्थेमध्ये विकसित केले जाते. बार्सिलोना आणि स्पेनचा वैभव सूर्यवंशी असलेला लमिन यमाल हा त्याचे ताजे उदाहरण. गोल साध्य करण्यासाठी क्रीडाविकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. पाच-दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अपेक्षित लक्ष्यपूर्ती होत असते. स्पेनने २००८ मध्ये युरो कप जिंकला, २०१० मध्ये प्रथमच वर्ल्ड कप उंचावला आणि २०१२ मध्ये पुन्हा युरो कप! अशी कामगिरी करणारे ते एकमेव युरोपीय आहेत. ही किमया एका रात्रीत नाही घडली. त्यासाठी नवीन सहस्रकापासून चॅम्पियन खेळाडूंची फळी तयार केली जात होती. तसेच, आताही युरो चषक जिंकून वर्ल्ड कपमध्ये उतरताना स्पेनला यंदा फेव्हरिट म्हणून बिरूद लावले जात आहे. स्पॅनिश फुटबॉलची सध्याची पिढी तयार करण्याचे काम हे दहा वर्षांपूर्वीच सुरू झाले होते.
घटक ३ - क्लब फुटबॉल आणि राष्ट्रीय संघ यांची सकारात्मक भूमिकेतून सांगड. हे दोन्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून एकमेकांना पूरक घटक आहेत. स्पॅनिश राष्ट्रीय संघ जिंकला, तर ला लिगाची पत वाढून त्यांचा व्यावसायिक फायदा आहे. ला लिगामधील क्लबने आपल्या प्रशिक्षण केंद्रांमधून चांगले खेळाडू तयार केले, तर स्पॅनिश राष्ट्रीय संघ युरो व जागतिक विजयापर्यंत पोचू शकेल.
भारतामध्येही क्लब व्यवस्था केंद्रभूत धरून फुटबॉल विकासाची धोरणे आखली जातील, असे क्रीडामंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. त्या दिशेने अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. आपणही स्पेनकडून याकामी बरेच काही बोध घेऊ शकतो. या सर्व स्पॅनिश फिएस्टाचा वेध घेण्याचे कारण म्हणजे आज, सोमवारी रात्री साडेनऊ वाजता होत असलेला स्पेनचा सामना. तो पाहताना तुम्हाला या युवा प्रतिभेचा आणि फुटबॉल विकासाच्या आराखड्याचा अंदाज येईलच.
आदिऑस!
(लेखक हे व्हिवा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत.)





