ठाकरे पक्षाचे ७ खासदार, १६ आमदार संपर्कात

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी दावा केला आहे की, उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार आणि १६ आमदार संपर्कात आहेत. हे सर्वजण आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेत प्रवेश करू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळत असल्याने अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

ठाकरे पक्षाचे ७ खासदार, १६ आमदार संपर्कात
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ ऑपरेशन टायगर ’बाबत शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सात खासदार आणि १६ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून, विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा त्यांनी केला.

सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तुमाने म्हणाले, ‘ऑपरेशन टायगर’ लवकरच जनतेला दिसेल. ज्या पद्धतीने एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी सर्व तपासण्या आणि तयारी केली जाते, त्याचप्रमाणे ऑपरेशन टायगरपूर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनचे ‘मुख्य डॉक्टर’ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीचा उल्लेख केला. त्या बैठकीस पाच खासदार अनुपस्थित होते, तर उपस्थित असलेल्या दोन खासदारांचाही शिवसेनेशी संपर्क असल्याचा दावा त्यांनी केला. तुमाने म्हणाले, सर्व खासदार आणि आमदार आपल्या मतदारसंघातील विकासाला प्राधान्य देतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळत असल्याने अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सात खासदारांसह १६ आमदारांनीही शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असेही त्यांनी सांगितले. मात्र, संपर्कात असल्याचा दावा केलेल्या खासदार- आमदारांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत. तुमाने यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात ‘ऑपरेशन टायगर’ नेमके कशाप्रकारे होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांच्या दाव्यामुळे राजकी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही तुमाने यांच्या दाव्याचे खंडन केले आहे.