बेंगळुरूमध्ये अनेक विद्यार्थ्यांची ‘नीट’ हुकली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बेंगळुरूमध्ये अनेक विद्यार्थ्यांची ‘नीट’ हुकली
नीट-यूजीच्या रविवारी घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेदरम्यान बेंगळुरूत काँग्रेसने काढलेल्या रॅलीमुळे नवा राजकीय वाद उद्भवला आहे.

या रॅलीमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन केंद्रावर पोहोचताना परीक्षार्थींना कसरत करावी लागली. किमान तीन उमेदवारांची परीक्षाच हुकली. यावरून पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या.
देशभरात रविवारी नीट-यूजीची फेर परीक्षा पार पडली. दुपारी दोन वाजाता ही परीक्षा सुरू झाली. जसजसा घडाळ्याचा काटा सरकू लागला, तसतशी बेंगळुरूच्या रस्त्यावर धावपळ, गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना दुचाकीने घेऊन निघालेले पालक कशीबशी वाट काढण्याचा प्रयत्न करीत होते. काहींनी तर फूटपाथवरूनच दुचाकी चालवल्या. तीन विद्यार्थ्यांनी अशी पराकाष्ठा करत केंद्र गाठले; पण त्यांना प्रवेशच देण्यात आला नाही. त्यांनी परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आत चढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आतील दरवाजाही बंद झाला होता. तिथेच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

संतापलेल्या पालकांनी वाहतूककोंडीस कारणीभूत ठरलेल्या काँग्रेस च्या रॅलीवर या परिस्थितीचे खापर फोडले. आपला रोष व्यक्त करताना त्यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोप केले. ‘पक्षासाठी विद्यार्थीहितापेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे,’ असा आरोप भाजपने केला. ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नी तेजस्वी सूर्या यांनी सर्वप्रथम माफी मागायला हवी,’ असे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, नीट-यूजी फेरपरीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करणारा व्हिडिओ बनावट आहे, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले.

पोलिसांच्या तत्परतेने छायाचित्र

कोची : कोचीमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एका विद्यार्थिनीला दिलासा मिळाला. वायपीन येथे राहणारी सना जोस हिच्याकडे छायाचित्र नव्हते. पोलिसांनी एका स्टुडिओ मालकाला फोन करून तिच्या छायाचित्राची सोय केल्याने ती परीक्षा देऊ शकली.

जयपूर : जयपूरमधील नीट-यूजी फेरीपरीक्षा केंद्रावर मोबाइल फोनचा वापर करताना आढळून आल्याने २२ वर्षीय तरुणीला पकडण्यात आले. तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हिमांशी तिवारी असे तिचे नाव आहे. बिहारमध्ये या फेरीपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३० जणांना अटक करण्यात आली.