Demand For Dharmendra Pradhans Resignation Farmers Support Cjp
‘सीजेपी’ला शेतकऱ्यांचा पाठिंबा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या देणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनात आता शेतकरी संघटनांचा चंचुप्रवेश झाला आहे.
पंजाबमधील शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ‘सीजेपी’च्या मागण्यांबाबत सरकारने हालचाली न केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय किसान युनियनने (चढूनी गट) जंतरमंतर येथे सुरू असलेल्या ‘सीजेपी’च्या आंदोलनाला सोमवारी पाठिंबा जाहीर केला आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर काही वर्षांपूर्वी झालेल्या व केंद्र सरकारला सपशेल माघार घ्यावी लागलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शेतकरी संघटनेचा चढूनी गट अग्रेसर होता.
त्यांनी ‘सीजेपी’च्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देताना, मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य असल्याचे सांगितले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर शेतकरी जंतरमंतरवर येतील, असा इशारा या संघटनेचे नेते गुरनामसिंग चढूनी यांनी दिला. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलेल्या मेणबत्त्या दिल्ली पोलिसांनी जप्त केल्याचा आरोप सोमवारी ‘एक्स’द्वारे केला. मागणी मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.