अरूप रॉय ‘तृणमूल’च्याबंडखोर गटाचे अध्यक्ष

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अरूप रॉय ‘तृणमूल’च्याबंडखोर गटाचे अध्यक्ष
तृणमूल काँग्रेसवरील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या संघर्षात सोमवारी नाट्यमय घडामोड घडली. पक्षाच्या बंडखोर गटाने कोलकातामध्ये विशेष बैठक बोलावत ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. बंडखोरांच्या ‘तृणमूल पक्षा’च्या मुख्य सल्लागारपदी ममता बॅनर्जी यांना यायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

न्यू टाउनमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित या विशेष बैठकीत अनेक जिल्ह्यांतील बंडखोर आमदार, नगरसेवक आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या मंचावरील बॅनरने ठळकपणे राजकीय संदेश स्पष्ट केला. एका बाजूला तृणमूल काँग्रेसचे पक्षचिन्ह ठळकपणे प्रदर्शित केले होते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. पक्षाचे दीर्घकाळापासून प्रमुख चेहरे राहिलेल्या ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात आलेले नाही.