बनावट क्रमांकाची कार आढळली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
fake number plate found case filed against vehicle owner
छत्रपती संभाजीनगर : ‘डायल ११२’वर संशयित वाहनाबाबत कॉल आला. पोलिसांनी वाहनाची चौकशी केली असता, दोन महिन्यापासून बनावट नंबर टाकून फिरणाऱ्या वाहन मालक आदिनाथ किसन मैंद याच्याविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंमलदार आशिष राठोड यांनी तक्रार दिली. उस्मानपुरा भागातील शक्ती अपार्टमेंटच्या परिसरात संशयित वाहन उभे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी डायल ११२ वर दिली होती. त्यानंतर राठोड व त्यांचे सहकारी शक्ती अपार्टमेंटच्या परिसरात पोहोचले. या ठिकाणी कार क्रमांक एमएच २० ईजे १८६० ही उभी होती. अॅपवर तपासले असता, क्रमांकाबाबत शंका आली. राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन मालकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी वाहन मालक आदिनाथ मैंद याला शोधून काढले. आदिनाथ मैंदकडे वाहनाच्या क्रमांकाबाबत विचारणा केली असता त्याने वाहनाचा खरा नोंदणी क्रमांक एमएच २८ एझेड १०२० असा असल्याची कबुली दिली. गेल्या दोन महिन्यांपासून आदिनाथ बनावट क्रमांकाचे वाहन वापरत असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी आशिष राठोड यांच्या तक्रारीवरून, मैंद याच्याविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.