गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने सायबर गंडा

महाराष्ट्र टाइम्स

गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी दोन नागरिकांची फसवणूक केली. बनावट संदेश आणि एपीके फाईल पाठवून आठ लाख ६० हजार रुपये लंपास केले. अलंकार आणि मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी अशा संदेशांपासून सावध राहावे. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी.

cyber fraud of eight lakh under the pretext of gas bill update

गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याच्या बहाण्याने बनावट संदेश आणि ‘एपीके फाइल’ पाठवून सायबर चोरट्यांनी दोन जणांची एकूण आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, नागरिकांनी अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील हिमाली सोसायटीत राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेला ३० मे रोजी गॅसपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीच्या नावाने संदेश प्राप्त झाला. गॅस बिल अपडेट न केल्यास पुरवठा बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना बनावट ‘एपीके फाइल’ पाठविली. त्यानंतर बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवून मोबाइलवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून चार लाख ९७ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

याच पद्धतीने मुंढवा परिसरातील तरुणालाही जाळ्यात ओढण्यात आले. सायबर चोरट्यांनी त्याची तीन लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सागर गोडे करत आहेत.

संशयास्पद संदेशांवरील लिंक उघडू नये, ‘एपीके फाइल’ डाउनलोड करू नये आणि अधिकृत संकेतस्थळ किंवा ग्राहक सेवा केंद्रातूनच माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.