पुण्यातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये उद्या, बुधवारी (१७ जून) उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये पुणे ते शिर्डीदरम्यान ‘इंटरसिटी’प्रमाणे रेल्वेसेवा सुरू होणार आहे. याशिवाय हडपसर ते दानापूरदरम्यान नवीन ‘अमृत भारत सेवा’ होणार आहे. पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-शिर्डीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण थेट रेल्वेसेवा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यानुसार आता रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वेमंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अद्याप या रेल्वेगाडीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या दोन दिवसांत या गाडीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हडपसर येथून दानापूरसाठी अमृतभारत रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. त्याचेदेखील सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन केले जाणार आहे. या वेळीही मुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक लवकर जाहीर केले जाणार आहे. पुण्यातून दिल्लीसाठी अमृतभारत सुरू करण्याची मागणी आहे; पण दानापूरसाठी गाडी सुरू केल्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे. पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेसची देखभाल दुरुस्ती दानापूर येथेच केली जाणार आहे. त्या विभागाने ही गाडी सुरू केली आहे. पुण्यातून राज्याअंतर्गत गाड्या सुरू करण्याची मागणी असताना उत्तर भारतासाठी गाड्या सुरू केल्या जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे.
शिर्डी हे पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. पुण्यापासून मिळणाऱ्या या नवीन थेट रेल्वे सुविधेमुळे भाविकांची मोठी सोय होणार असून, या भागातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. पुणे ते शिर्डीदरम्यानची ही पहिली थेट रेल्वे सेवा असून, या सेवेमुळे अहिल्यानगर आणि शिर्डी येथील रहिवाशांना पुण्यातील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. या रेल्वेमुळे या भागातील दळणवळण सुधारण्यास, पर्यटन व व्यापारास चालना मिळण्यास आणि प्रवाशांची सोय होण्यास मदत होईल.








