काळ्याकुट्ट तेलात तळण; आरोग्य धोक्यात

Contributed byप्रवीण लोणकरPravin.Lonkar@Timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खाद्यतेलाचा वारंवार वापर आरोग्यासाठी घातक ठरतो. तेलातील पोलार कंपाउंट २५ युनिटच्या वर गेल्यास तेलाची गुणवत्ता खालावते. यामुळे हृदयाचे आणि मेंदूचे आरोग्य धोक्यात येते. नागपूरमध्ये एफडीएकडे गेल्या सहा वर्षांपासून टीपीसी मशीन नसल्याने तेलाची तपासणी होत नाही. आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी टीपीसी मशीन खरेदीचे आश्वासन दिले आहे.

काळ्याकुट्ट तेलात तळण; आरोग्य धोक्यात

खाद्यतेलातील पोलार काउंट २५च्या वर गेल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तेलातील ट्रान्सफॅट वाढतात. यामुळे हृदयातील आणि मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊ शकतात. ट्रान्सफॅट्समुळे शरीरातील वाइट कोलेस्टेरॉल वाढतात आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमय बिडकर यांनी सांगितले.

नागपूर : तळलेले पदार्थ आपण मिटक्या मारून खातो. मात्र, अनेक खाद्यपदार्थ विक्रेते दिवसभर एकाच तेलात तळण काढून असे पदार्थ बनवत असतात. यातून थेट आरोग्याचा धोका असतानाही गेल्या सहा वर्षांपासून एफडीएकडे टीपीसी (टोटल पोलार कंपाउंड्स) मशिन्सच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले.

काळ्याकुट्ट तेलात तळण; आरोग्य धोक्यात

काळ्याकुट्ट तेलात तळण; आरोग्य धोक्यात

तळण काढताना तेलाचा वापर केवळ तीनवेळा करता येतो. चवथ्यांदा त्या तेलाचा वापर करायचा असल्यास त्यात नवीन तेल टाकणे बंधनकारक आहे. घरी खाद्यपदार्थ बनविणे आणि विकत आणणे याचा खर्च जवळपास सारखाच असतो, असा विचार करून अनेकजण आजकाल स्वस्त मिळते म्हणून तळलेल्या पदार्थांची बाहेरूनच खरेदी करतात. मात्र, काही विक्रेत्यांकडून स्वस्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे अर्थशास्त्र ‘मटा’च्या चमूने जाणून घेतले असता तेलाचे काळे वास्तव पुढे आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तेलातील ‘पोलर कंपाउंट’ तपासले जातात. चांगल्या तेलातील ‘पोलर कंपाउंट’ २५ युनिटच्या आत हवे. यापेक्षा जास्त असल्यास तेलाची गुणवत्ता कमी आहे, असे समजले जाते. या प्रकारामुळे तेलातील ‘फ्री फॅटिअॅसिड’चे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे तीनपेक्षा जास्तवेळ तळण काढायचे असल्यास त्या तेलात दुसरे शुद्ध तेल मिसळणे आवश्यक आहे. असे केल्याने पोलॅरिटी कमी होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

खाद्यतेलाला विक्रेत्याकडून किती वेळा वापर होत आहे, याची तपासणी करण्यासाठी टीपीसी वापरले जाते. टीपीसी हे खाण्याच्या तेलाची गुणवत्ता मोजण्याचे एक परिमाण आहे. वारंवार तळल्या जाणाऱ्या तेलात होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे (ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस आणि पॉलिमरायझेशन) टीपीसी तयार होतात. मात्र, एफडीएकडे टीपीसीच नसल्याने या तेलाची तपासणीच करण्यात आली नाही.

१४ यंत्र खरेदीचे आश्वासन

जिल्ह्यात १४ अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने १४ टीपीसी मिळाव्यात, अशी मागणी एफडीएने केली होती. याबाबतचा प्रस्ताव एफडीएकडून वेळोवेळी देण्यात आला; मात्र, त्यावर अंमलबजावणीच झाली नाही. नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून टीपीसी यंत्र विकत घेतले जाईल, असे आश्वासन दिले. सहा वर्षांनंतर प्रशासनाकडून आश्वासन येते, मात्र आतापर्यंत लोकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या यंत्रणेला जाब कोण विचारणार, असा सवाल जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे सदस्य प्रमोद पांडे यांनी उपस्थित केला.