ट्रम्प यांनी यंदा फेब्रुवारीत एकतर्फी व्याापार करार जाहीर केला तेव्हा तडजोडवादी मोदी गप्प का राहिले, अमेरिका भारताच्या नागरिकांची हत्या करत असताना पंतप्रधानांनी निषेधाचा शब्दही का उच्चारलेला नाही, असे प्रश्न श्रीनेत यांनी उपस्थित केले. साडेतीन महिन्यांच्या युद्धात विश्वगुरू कोणत्या बिळात जाऊन बसले होते, पंतप्रधानांची भूमिका फक्त हात हलविणे, संगीताचा आस्वाद घेणे इतकीच राहिली. मोदी संगीत नाटक अकादमीत गेले असते तर त्यांच्या करियरसाठी चांगले राहिले असते, असा हल्लाबोल श्रीनेत यांनी केला.
पश्चिम आशियातील युद्धसमाप्तीसाठी अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी केली. ‘दरवाढ मागे घेण्याची ही आनंदाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधूनच जाहीर करतील, की देशाला त्यांच्या परतण्याची वाट पाहावी लागेल,’ असा उपरोधिक प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील हा करार पुढे नेण्यात पाकिस्तानसह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीये यांसारख्या देशांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इराणसोबत भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असूनही भारत या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर राहिला व आता होमुर्झमध्ये अडकलेल्या १३-१४ हजार भारतीय जहाजांवरील शेकडो भारतीय नाविकांचे प्राण धोक्यात असताना पंतप्रधान गप्प राहिल्याबद्दल काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ‘एक्स’ वरून टीकास्त्र सोडले. पक्षनेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला.
खेरा यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले, ‘अमेरिका इराण यांच्यातील करार जागतिक शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल असले तरी भारतासाठी ही आत्मपरीक्षणाची बाब आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेत देशाची भूमिका जवळजवळ शून्य राहिली. मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात घनिष्ट संबंधांची चर्चा असताना भारत या युद्धात प्रभावी भूमिका बजावण्यात का अपयशी ठरला व कंगाल पाकिस्तानचे महत्व कसे वाढले ? भारताने आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादाच्या मुद्द्यावर कंगाल पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला नाही. पाकिस्तान आता शांतता आणि स्थिरतेचा समर्थक म्हणून स्वतःला यशस्वीपणे स्थापित करत आहे.’








