नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विदर्भातील ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सिव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २८ जून रोजी हा सोहळा होईल. सत्कारमूर्तींमध्ये शंकरबाबा पापळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. विलास डांगरे, डॉ. परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल व जनार्दनपंत बोथे यांचा समावेश आहे. समारंभाबाबत अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
सीबीएसई शाळाही ३०पासून
नागपूर : राज्य परीक्षा मंडळाच्या शाळांप्रमाणेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळाही आता ३० जून रोजी सुरू होणार आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने याबाबत दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील तापमान सध्याचे तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामु ळे, सीबीएसई शाळांनीही विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये, असे आदेश जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश गुंड आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहीफळे यांनी दिले आहेत.
वैद्य यांच्यावरील ग्रंथासाठी साहित्य पाठवा
नागपूर : प्रख्यात संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या समग्र साहित्याचे खंडश: प्रकाशन करण्यात येणार आहे. मा. गो. वैद्य स्मृती न्यासाच्यावतीने हे साहित्य प्रकाशन केले जाईल. त्याअंतर्गत पहिला खंड वैद्य यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांवर आधारित असेल. अशी व्यक्तिचित्रे ज्यांच्याकडे असतील त्यांनी सुनील शिनखेडे (९९७५२६५२९३) यांच्याशी संपर्क साधून ३१ जुलैपूर्वी साहित्य पाठवावे, असे आवाहन न्यासाचे सचिव दत्ता टेकाडे यांनी केले आहे.








