करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरचा ६० दिवसांचा कालावधी युरेनियम काढून टाकण्याबाबतच्या तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी वापरला जाईल.
अमेरिका-इराण यांच्यात शांतता करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या होणार असल्या तरी त्यानंतरच्या ६० दिवसांत उभय देशांमध्ये होणाऱ्या वाटाघाटींमध्ये इराणच्या पदरात नेमके काय पडते, याकडे जगाचे लक्ष लागून राहणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा रविवारी ८०वा वाढदिवस होता. त्याचे निमित्त साधत इराणशी शांतता करार झाल्याचे त्यांनी जाहीर केले. होर्मुझची सामुद्रधुनी लगेचच सुरू होईल आणि त्याचवेळी सामुद्रधुनीतील अमेरिकी नाकाबंदीही संपुष्टात येईल, असे ट्रम्प यांनी संदेशात नमूद केले. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात होर्मुझची कोंडी शुक्रवारी फुटेल, असे त्यांनी दुसऱ्या संदेशाद्वारे स्पष्ट केले.
इराणचे म्हणणे
अमेरिका-इराण यांच्यात शांतता करारावर एकमत झाल्याच्या वृत्ताला इराणच्या परराष्ट्र खात्याकडून दुजोरा देण्यात आला. कराराची अंमलबजावणी करण्यास; तसेच इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले थांबविण्यास सर्वस्वी अमेरिका जबाबदार असल्याचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटल्याचे ‘आयआरएनए’ या सरकारी वृत्तसंस्थेने नमूद केले. तर उपपरराष्ट्रमंत्री काझेम घरिबाबादी यांनी शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये स्वित्झर्लंडमध्ये करारावर स्वाक्षऱ्या होतील, हे निश्चित केले.








