गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाभोवती जंगल असून तेथे वन्य श्वापदे आहेत. आतील प्राणी बाहेर जाऊ नयेत म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बाहेरील प्राण्यांनी आत जाऊ नये म्हणून येथे पुरेसे सुरक्षित कुंपण घालण्यात आलेले नाही. प्राणिसंग्रहालयाभोवती सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या स्तरावर अडगळीत पडून आहे. त्यामुळे, आजवर प्राणिसंग्रहालयाभोवती सौर कुंपण घातले गेले नाही. प्राणिसंग्रहालयात झालेल्या या घटनेनंतर सौर कुंपणाकडे झालेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
गोरेवाडा जंगलातून आलेल्या बिबट्याने बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन बिबट्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर वनविभागाने सलग शोधमोहीम राबवून या बिबट्याला सोमवारी पहाटे जेरबंद केले. या घटनेने वन विभागाच्या वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे कुंपण ओलांडून रविवारी दुपारी नर बिबट्या आत शिरला. बिबट सफारी परिसरातील पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या बिबट्यांशी त्याचा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये बाहेरील बिबट्याने प्राणिसंग्रहालयाच्या एन्क्लोजरमधील तीन बिबट्यांना ठार केले. ठार झालेल्या बिबट्यांमध्ये सफारीमधील दोन नर आणि एका मादीचा समावेश आहे. हा संघर्ष झाल्याचे लक्षात येताच वनविभागाने शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेदरम्यान संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या तीन बिबट्यांचे मृतदेह एकेक करून सापडत गेले.
गोरेवाडा जंगलातील बिबट प्राणिसंग्रहालयात शिरल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. मात्र, बाहेरील आणि आतील बिबट्यांच्या संघर्षात तीन बिबट्यांनी जीव गमावल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. तिन्ही मृत बिबट्यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या इंडियन सफारीत एकून आठ बिबटे होते. त्यापैकी, तीन बिबटे मारले गेल्यानंतर आता तेथे एक नर आणि चार मादी असे पाच बिबट उरले आहेत.








