नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी, भाजपचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याने विजय आमचाच होणार असल्याचा दावा केला आहे. मोठ्या प्रमाणात संख्याबळ असतानाही भाजपला त्यांचे नगरसेवक शहराबाहेर न्यावे लागले आहेत, हा एकप्रकारे त्यांचा पराभवच असल्याचा हल्लाबोलही यावेळी करण्यात आला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रेस क्लब येथे सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रपरिषद घेत विजयाचा दावा केला. यावेळी बोलताना काँग्रेसचे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले, या निवडणुकीत भाजपचे नेते सुरुवातीपासून त्यांच्याकडे मोठे संख्याबळ असल्याचा दावा करीत आहेत. असे असताना त्यांना त्यांचे नगरसेवक शहराबाहेर इतर राज्यांमध्ये न्यावे लागत आहेत. यावरून ते घाबरलेले आहेत असाच त्याचा अर्थ होतो. भाजपकडून नगरसेवक स्वखर्चाने सहलीला गेले असल्याचा दावा केला असला तरी गरज नसताना कोणी कशाला सहलीला जाईल, अशी टीकाही बर्वे यांनी यावेळी केली. यावेळी बर्वे यांनी, काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित असून कुठेही गेलेले नाहीत. याऊलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ही निवडणूक अविरोध व्हावी यासाठी अनेक प्रकारचे दबाव आणण्यात आले. मात्र, इतरत्र जरी निवडणूक अविरोध झाली असली; तरी, नागपूर जिल्ह्यात काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. आमच्याकडे संख्याबळ नसले तरी निवडणूक लढवणे हाच आमचा विजय असल्याचे बर्वे म्हणाले. यावेळी भाजपचे किती नगरसेवक संपर्कात आहेत, असे विचारले असता खासदार बर्वे यांनी, निकालाच्या दिवशी आम्हाला मिळालेल्या मतांवरून ते कळेलच, असा दावा केला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी, भाजपकडून ओबीसींचा सतत विश्वासघात करण्यात आला आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात मतदार हा ओबीसी समाजातून आहे. असे असतानाही जनगणनेत ओबीसींसाठी कुठलाही कॉलम नाही. ओबीसींसाठी जनगणनेत कॉलम असणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, असे असताना तो देण्यात आलेला नाही. यावरून भाजप ओबीसी विरोधी असल्याचे दिसून येते, अशी टीका केली. महाविकास आघाडीचे उमदेवार अतुल लोंढे यांनीही भाजपकडून बहुजनांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप केला.
पत्रपरिषदेला माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया आदी उपस्थित होते.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे हे अत्यंत परिपक्व आहेत. त्यांना अनेक विषयांची जाण आहे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. याऊलट भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे याप्रकारचा कुठलाही अनुभव नाही. नेमके कोण अधिक परिपक्व आहे हे कळेल. एका स्वयंसेवी संस्थेने या चर्चेची तयारी दाखवली आहे. भाजप उमेदवाराने या चर्चेसाठी तयारी दाखवावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.








