मौलानाच्या अटकेसाठी पोलिस एमपीत

महाराष्ट्र टाइम्स

सोनेगाव भागात एका विवाहितेवर धर्मांतरणासाठी दबाव टाकणाऱ्या मौलानाला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. या प्रकरणात अय्याज ताज मदारे आणि आमीन शेख हे दोघे अटकेत आहेत. पीडितेवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरणाचा प्रयत्न झाला. या घटनेची चित्रफित व्हायरल झाली असून पोलीस तपास करत आहेत.

मौलानाच्या अटकेसाठी पोलिस एमपीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सोनेगाव भागात राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरणासाठी दबाव टाकणाऱ्या हजरत मौलाना (रा. तामिया, छिंदवाडा) याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. पोलिसांचे पथक सोमवारी उशिरा रात्री तामियात दाखल झाल्याची माहिती आहे. वृत्तलिहिपर्यंत मौलाना पोलिसांना सापडलेला नव्हता. या धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी पीडितेचा वर्गमित्र अय्याज ताज मदारे (वय २६, रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) व त्याचा साथीदार आमीन शेख (वय ३०, रा. कळमेश्वर) हे दोघे अटकेत आहेत.

पीडिता प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. प्लॉट खरेदीच्या बहाण्याने गेल्यावर्षी अय्याजने तिच्याशी संपर्क साधला. हॉटेलमध्ये नेले. गुंगीचे औषध असलेले ज्यूस पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. मौलाना व आमीन या दोघांनी पीडितेवर धर्मांतरणासाठी दबाव टाकला. अखेर पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अय्याज व आमीनला अटक केली. पोलिसांनी दोघांची पाच दिवस पोलिस कोठडी घेतली असून त्यांचे मोबाइल जप्त केले. तपासणीसाठी त्यांचे मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानंतर या टोळीने आणखी कोणासोबत धर्मांतरणासाठी प्रयत्न केला का हे स्पष्ट होईल. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. अटकेतील दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, कळमेश्वर येथे ३१ मे रोजी मौलानाने हिंदी व उर्दु भाषेत मंत्र म्हटले. संमोहित करून तिला धर्मांतरण झाल्याचे सांगितले. या सर्व घटनेची मोबाइलद्वारे काढलेली चित्रफित व्हायरल झाली आहे. ही चित्रफित एका तरुणीने काढल्याने ती तरुणीही संशयाच्या भोवऱ्यात असून पोलिस लवकरच तिची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने याबाबत अधिक सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.