नागपूर : अकराव्या वर्गातील प्रवेशांसाठी सुरू असलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नागपूर विभागात १५ हजार ९२६ प्रवेश झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी मंगळवार, १६ जून रोजी संपणार आहे. अकराव्या वर्गातील प्रवेशांसाठी शिक्षण संचालनालयाच्यावतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना रविवारी त्यांच्या कॉलेजांची अलॉटमेंट देण्यात आली. या विद्यार्थ्यांना सोमवारपासून प्रवेश घेण्यास प्रारंभ केला. दिवसअखेर, नागपूर विभागात १५ हजार ९२६ प्रवेश झाले. त्यापैकी १३ हजार ६७० प्रवेश कॅपद्वारे तर २ हजार २५६ प्रवेश विविध कोटा प्रवर्गातून झाले आहेत. यामध्ये, इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ जूनच्या सायंकाळी ६ वाजतापर्यंत मिळालेल्या कॉलेजांमध्ये आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत.








