गेल्या काही दशकांत सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे लोकसंख्येतील साठ वर्षांपुढील वृद्धांचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबव्यवस्था आणि राहणीमानातील बदल; तरुणांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, यामुळे वृद्धांचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत. वाढत्या वयाबरोबर मनुष्याच्या आरोग्याच्या गरजा वाढतात आणि त्याचबरोबर भावनिक आधार, सामाजिक संबंध, आर्थिक सुरक्षितता आणि सन्मान यांचीही आवश्यकता असते. अनेक वृद्धांना आज उपेक्षा, एकटेपणा आणि आर्थिक असुरक्षा अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अनेकांना एकटे राहावे लागते किंवा त्यांचे सामाजिक संबंध पूर्वीपेक्षा कमी होत चालले आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागांमधील वृद्धांच्या गरजा वेगवेगळ्या दिसतात; त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाधिक वृद्धांपर्यंत वेळेवर मदत आणि आधार पोहोचू शकेल, अशी सेवा आणि सहकार्य व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. याच गरजेची जाणीव ठेवून ‘स्कूल’ संस्थेने (सोसायटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरिएंटेड ऑपरेशनल लिंक्स) लोकसहभागावर आधारित ‘वृद्ध मित्र’ हा उपक्रम विकसित केला आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी डॉ. पवन पाठक व डॉ. राहुलसिंग भदौरिया यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. वृद्धांच्या बदलत्या आणि बहुआयामी गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम त्यांना केवळ सेवा नव्हे; तर आधार, सन्मान आणि आपुलकीचे सहकार्य देण्याचा प्रयत्न करतो. ही एक सर्वसमावेशक आणि समुदायाधारित व्यवस्था आहे. प्रत्येक वस्ती, परिसर आणि गावापर्यंत पोहोचून वृद्धांना आपल्या घरात आरोग्यपूर्ण, सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, समाजात सक्रिय सहभागी होता यावे आणि त्यांचे जीवनमान उंचावता यावे, यासाठी ही व्यवस्था कार्य करते.
प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आपल्या घरात आणि आपल्या माणसांमध्ये राहता यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत विचार आहे. कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने आपले घर, आपली माणसे आणि परिचित वातावरण सोडून वृद्धाश्रमात जाऊ इच्छित नाही. याच विचारातून प्रेरणा घेत ‘वृद्ध मित्र’ कार्यक्रमाने ‘एजिंग इन प्लेस’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे; ज्याद्वारे वृद्धांना सन्मान, सुरक्षितता आणि आवश्यक आधार आपल्या घरात आणि परिचित परिसरातच मिळून आयुष्य सुखकरपणे जगता येते. त्यांना आपल्या घरात, आपल्या माणसांमध्ये आणि परिचित परिसरात सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आधार मिळतो. वृद्धत्वात कोणालाही घर सोडून वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातात. छळ होत असलेल्या वृद्धांसाठी वृद्ध मित्रांकडून संपूर्ण साह्य केले जाते. प्राथमिक पातळीवर आजी-आजोबांना किंवा ज्यांच्याकडून अत्याचार होत आहेत, त्यांना समुपदेशन दिले जाते. दर महिन्याला जवळपास दोन हजार चारशे वृद्धांना आणि ११ हजार कुटुंबीयांना समुपदेशन केले जाते. गरज पडल्यास पुढे या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती किंवा संस्थांची मदत घेतली जाते. महाराष्ट्र पोलिसांनी कुटुंबातील कलह, महिलांवरील अत्याचार, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि पीडितांना एकाच छताखाली कायदेशीर व वैद्यकीय मदत मिळवून देणे, यासाठी ‘भरोसा सेल’ ही विशेष हेल्पलाइन आणि समुपदेशन सेवा सुरू केली आहे. वेळ पडल्यास त्यांचीदेखील मदत घेतली जाते. अगदीच नाईलाज झाल्यास आणि पीडित आजी किंवा आजोबा तयार असल्यास त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास मदत केली जाते. अनेक वृद्धांना याप्रकारे सहकार्य मिळाले आहे. याबरोबरच वृद्ध व्यक्तींचे हक्क, अधिकार आणि कायदे यावरही जनजागृती केली जाते.
ही संकल्पना काही ठरावीक प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता, अधिक व्यापक स्तरावर नेऊन शासनाच्या नियमित आरोग्य आणि सामाजिक सेवा व्यवस्थेत समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. यासाठी संस्थेची ‘निती आयोगा’बरोबर चर्चा सुरू आहे. देशात वृद्धांच्या काळजीसाठी सुसूत्र आणि मजबूत व्यवस्था कशी उभी करता येईल, ‘वृद्धमित्र’ या संकल्पनेला अधिक व्यापक स्तरावर कसे राबविता येईल आणि सध्याची व्यवस्था अधिक परिणामकारक कशी बनविता येईल, याचा विचार याद्वारे सुरू आहे.
(लेखिका ‘वृद्धमित्र स्कूल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)








