द्यकीय क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या व्यक्तीसाठी ‘निवृत्ती’ हा शब्द केवळ कागदावर असतो. प्रत्यक्षात रुग्णाच्या नाडीचे ठोके मोजता मोजता कधी स्वतःच्या आयुष्याची पंचाहत्तरी ओलांडली जाते हे धन्वंतरींना समजत नाही. जेव्हा हेच डॉक्टर वर्षातून तीन दिवस सगळे व्याप बाजूवा ठेवून एकत्र येतात; तेव्हा तिथं मैत्रीला पहिलं प्राधान्य मिळतं. मैत्रीचा हा डोस आम्हा सर्वांना सर्वांत गुणकारी वाटतो.
आज तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्र पूर्ण बदललं आहे. अशा वेळी डॉक्टरांचा एकत्र येणं, म्हणजे अनुभवांचा चालता बोलता इतिहासच आहे. आम्ही एकत्र येतो, तेव्हाचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा असतो. या स्नेहसंमेलातून आठवणींचा प्रवास उलगडत जातो. वयाच्या पंचाहत्तरीनंतरचं आयुष्य हे खऱ्या अर्थानं स्वतःसाठी जगण्याचं असतं. या वयातही मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी गेट टुगेदरसारखे उपक्रम आवश्यक असतात. वैद्यकीय सेवा देताना ज्या हातांनी हजारो जीव बरे केले, त्याच हातांनी आज एकमेकांना साथ देत मैत्रीचं जग जपलं, हे दृश्य प्रेरणादायी वाटतं.
साताऱ्याच्या ‘आर्यांग्ल महाविद्यालया’त सुमारे ५५-६० वर्षांपूर्वी शिकलेल्या आणि आता पंचाहत्तरी पार केलेल्या आम्हा माजी विद्यार्थ्यांचा ‘एमएफएएम’ या नावाचा ग्रुप आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी; १९९७ मध्ये डॉ. नंदलाल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन बाहेर पडलेल्या मित्रांशी संपर्क करून माहिती गोळी केली. सन २००० मध्ये सातारा इथं पहिलं स्नेहसंमेलन आयोजित केलं. पुढं डॉ. उदय पाटीलनं हा ग्रुप सुरू केला. काही वर्षं ग्रुप थंडावला आणि पुन्हा सन २०२२ मध्ये आमचं स्नेहसंमेलन पौड इथं पार पडलं. काही जण येतील अशी अपेक्षा असताना ५६ जणांनी हजेरी लावली. खूप छान कार्यक्रम झाला.
पहिल्या दिवशी धन्वंतरी पूजनाने सुरुवात त्यानंतर मनोगत, करमणुकीचे कार्यक्रम, चहापाणी, गप्पागोष्टी, कॉलेजच्या आठवणी, रात्रीचं भोजन, आराम, दुसऱ्या दिवशीही आठवणींची देवाण-घेवाण, कॉलेजमधल्या बऱ्या-वाईट आठवणींना उजाळा, विविध गुणदर्शनानं दिवस रंगला. पन्नास वर्षांनी भेटीगाठी झाल्यानं तो वेगळाच आनंद प्रत्येकानं अनुभवला. अशाप्रकारे दोन दिवस कसे संपले, ते कळलंच नाही. सन २०२४ मध्ये कोकणवासीयांनी परशुराम इथं नियोजन केलं. डॉ. मेहेंदळे, डॉ. टिळक, डॉ. खरे, डॉ. केतकर, डॉ. विखारे यांनी उत्कृष्ट पद्धतीनं संमेलन पार पाडलं. गेल्या वर्षी आमची कर्मभूमी सातारा इथं संमेलन झालं. चंद्रसेन जाधव यांच्या हॉटेलात झालेल्या या कार्यक्रमाला जाधव यांचं उत्तम सहकार्य लाभलं. डॉ. रमेश कुलकर्णी, डॉ. कामत, डॉ. विभुते, डॉ. खोत यांचं मोलाचं सहकार्यही मिळालं. डॉ. शैला कुलकर्णी-पाठक, डॉ. शोभा शहा-दोशी, डॉ. रंजना भुंजे-कोल्हे, डॉ. फडे यांनी हा कार्यक्रम उत्तम आयोजित करून मजा आणली. आता पुढील वर्षीच्या भेटीगाठींचे वेध लागले आहेत. मैत्रीचं हे टॉनिक आम्हा सगळ्यांना दर वर्षी मिळत राहो, अशा शुभेच्छा.








