हजारावर पोलिसांच्या गराड्यात येणार दीपके

महाराष्ट्र टाइम्स

जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासाठी हजारो पोलीस तैनात असतील. विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत आणि आंदोलनस्थळापर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असेल. वाहतूक सुरळीत ठेवण्याचेही नियोजन केले आहे. आंदोलकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हजारावर पोलिसांच्या गराड्यात येणार दीपके
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिस अलर्ट झाले आहेत. आज मंगळवार, १६ जून रोजी दुपारी ४ वाजता दीपके यांच्या नेतृत्वात स्थानिक संविधान चौकात आंदोलन होणार असल्याने आगमनापासून तर नागपूर सोडेपर्यंत दीपके यांना हजारावर पोलिसांचा गराडा राहणार आहे.

मंगळवारी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत दीपके यांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेतला. मंगळवारी सकाळी दीपके विमानाने नागपुरात येतील. त्यानंतर ते वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत त्यांना सशस्त्र विशेष पथकाची सुरक्षा देण्यात येणार आहे. ते जात असलेल्या प्रत्येक ठिकाणी हे विशेष पथक सोबत राहील. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नीट पेपर फूट, बेरोजगारी व शिक्षणक्षेत्रातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दीपके यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आंदोलन होणार आहे. आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये; तसेच या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, याचेही नियोजन पोलिसांनी केले आहे.

संविधान चौकात अपर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात चार पोलिस उपायुक्त, तीन साहाय्यक पोलिस आयुक्त, १८ पोलिस निरीक्षक, ४५ साहाय्यक पोलिस निरीक्षक-उपनिरीक्षक ४७० पुरुष व १७० महिला कर्मचारी संविधान चौकात तैनात असतील.

याशिवाय दोन दंगल नियंत्रण पथकेही पोलिसांच्या मदतीला असतील. याशिवाय विमानतळापासून ते संविधान चौकापर्यंत वाहतूक पोलिसांचाही वेगळा बंदोबस्त राहील. दरम्यान, गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाली असून, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारीही या ठिकाणी राहतील.

आंदोलन शांततेत पार पडावे व संविधान चौकात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करावे. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.