Anna Hazares Right To Information Movement Warning
अण्णांचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नाशिक : माहितीच्या अधिकारात राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या बदलांना ज्येष्ठ समाजसेवक आणि या अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. हे बदल रद्द न केल्यास पाच जुलैपासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की माहितीचा अधिकार कायदा हा नागरिकांच्या पारदर्शक शासन व्यवस्थेच्या हक्काचा आधारस्तंभ आहे. मात्र, नव्या नियमांमधील वाढीव शुल्क, ओळखपत्र जोडण्याची सक्ती, एक विषय-एक अर्ज, ही अट, पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद, माहिती मागण्याचे कारण विचारण्याची सक्ती, सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास अपील फेटाळणे, अर्जदाराच्या मृत्यूनंतर प्रकरण बंद करणे, माहिती आयोगासमोर वकिलांची मदत नाकारण्याची तरतूद यांसारखे अनेक नियम माहितीचा अधिकार अधिनियम, २००५च्या मूळ भावनेशी विसंगत आहेत.‘माहितीचा अधिकार हे सरकारचे उपकार नसून, तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही. सरकारने १२ जून २०२६चे नियम तातडीने मागे घ्यावेत; अन्यथा पाच जुलै २०२६पासून बेमुदत उपोषण सुरू होईल,’ असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.