Basavaraj Patils Historic Victory Bjps Second Term
बसवराज पाटील यांंचा विक्रमी विजय
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उस्मानाबाद – लातूर – बीड विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा दारूण पराभव केला. मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत बसवराज पाटील यांनी विक्रम प्रस्थापित केले.
धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला. ९८८ मतदारापैकी ९८३ जणांनी मतदान केले होते. त्यापैकी १४ जणांचे मतदान अवैध ठरविण्यात आले. ९६९ पैकी बसवराज पाटील यांना ८४४ मते पडली.
महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना १२४ मतांवर समाधान मानावे लागले. त्यांना अनामत रक्कम राखता आली नाही. तीनही जिल्ह्यांतील एकूण मतदारांपैकी महायुतीच्या मतदारांची संख्या ७५० हून अधिक होती. बसवराज पाटील यांना प्रत्यक्षात शंभरहून अधिक मते मिळाली. महाविकास आघाडीची मते फुटल्याने काँग्रेस उमेदवारावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली.
मागील निवडणुकीत भाजपचे सुरेश धस या मतदारसंघातून विजयी झाले होते. सलग दुसऱ्यांदा भाजपने विजय मिळवला.
बसवराज पाटील यांच्या विजयाची घोषणा होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.