रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र टाइम्स
रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या लेपनास दिलेल्या स्थगितीविरोधात मंदिरे समितीने वरिष्ठ न्यायालयात अपील केले आहे. त्यावर आज, मंगळवारी (२३ जून) सुनावणी होणार आहे. परिणामी, २३ व २४ जून रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी नियमितपणे खुले राहील, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित रासायनिक लेपन (वज्रलेप) प्रक्रियेला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील वारकरी, भाविक आणि मंदिर प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
मूर्तींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने संबंधित यंत्रणांकडून रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत बदल करण्यासह आवश्यक तयारी सुरू केली होती. मात्र, या प्रक्रियेमुळे मूर्तींच्या मूळ स्वरूपावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करून काही वारकरी संघटना, अभ्यासक आणि भाविकांनी तीव्र आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यांनी मूर्तींवर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेचा सविस्तर तांत्रिक अहवाल, तज्ज्ञ समितीचे मत आणि धार्मिक परंपरांचा विचार करण्यात यावा, अशी मागणी न्यायालयासमोर केली होती. त्यानंतर झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.