Mahayutis Victory Leaves Mark In Marathwada Elections
मराठवाड्यात महायुतीचाच बोलबाला
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
विधान परिषदेच्या मराठवाड्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. भारतीय जनता पक्षाचे तीन, तर शिवसेनेचा एक उमेदवार या निवडणुकीत विजय झाला. विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीला कुठेही चमत्कार करून दाखवता आला नाही.
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाठ यांचा विजय झाला. त्यांना ४५५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३५ मते मिळाली. अपक्ष उमेदवार इसाक संदू खान यांना ३५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला. महायुतीचा विजय हा निश्चितच होता, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. निकाल घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नांदेडमध्ये राजूरकर विजयी
नांदेड स्थानिक स्वराज मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय झाला. त्यांनी ३३९ मताधिक्य मिळवत विजय संपादित केला. अपक्ष कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४, तर प्रशांत इंगोले यांना केवळ पाच मतांवर समाधान मानावे लागले. तर मतमोजणीत २३ मते अवैध ठरविण्यात आली.
धाराशिवमध्ये फुलले कमळ
विधान परिषदेच्या उस्मानाबाद– लातूर– बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी विजय मिळविला. पाटील यांना एकूण ८४४ मते मिळाली,तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे महेश माणिकराव देशमुख यांना १२५ मते मिळाली. त्यामुळे बसवराज पाटील यांनी तब्बल ७१९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला.
या निवडणुकीत एकूण ९८३ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरल्याने ९६९ वैध मते ग्राह्य धरण्यात आली. निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा ४८५ मतांचा होता. बसवराज पाटील यांनी हा कोटा पार करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
परभणीत शिवसेनेचे खान विजयी
परभणी-हिंगोली मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सईद खान शेरगुल खान विजयी झाले. त्यांना २४२ मते मिळाली. शिवसेना उबाठा पक्षाचे विवेक नावंदर यांना १५९, अपक्ष सुशीलकुमार देशमुख यांना ५६ मते मिळाली. आठ मते बाद झाली.