पोलिस आयुक्तालय ताथवडे येथे होणार

महाराष्ट्र टाइम्स
police commissionerate to be established in tathwade revenue minister approves land transfer
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय, कवायत मैदान आणि इतर आनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीतील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन आदेश काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने गृह विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील वळूभाता प्रक्षेत्र येथे ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पोलिस आयुक्तालय , कवायत मैदान व इतर संबंधित कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर गृह विभागाने शासन आदेश आठ सप्टेंबर २००८मधील तरतुदींनुसार जमीन हस्तांतराची कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाच्या दृष्टीने सक्षम पायाभूत सुविधा आणि पोलिस आयुक्तालयाच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात आली.