परभणी : महायुतीचे शिवसेना उमेदवार सईद खान शेरगुल खान यांनी ४६५ पैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक २४२ मते मिळवून विजय पटकाविला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी, सकाळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण व निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यात एकूण ४६५ मतांपैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे २४२ मते महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पटकावले. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) उमेदवार डॉ.विवेक नावंदर यांना १५९, तर अपक्ष उमेदवार सुशिलकुमार देशमुख यांना ५६ मते मिळाली. एकूण ८ मते बाद झाली. विजयासाठी २२९ मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. महायुतीचे सईद खान यांना पहिल्या पसंतीचे २४२ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते खान यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले.