Suhas Shirsaths Victory Bjps Resounding Win And Defeat Of Shiv Sena
भाजपचे सुहास शिरसाठ यांची बाजी
Contributed by: पराभूत उमेदवार,नवनिर्वाचित आमदार,ओबीसी कल्याण मंत्री,ठाकरे पक्ष|महाराष्ट्र टाइम्स•
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी बाजी मारली. त्यांनी ४५५ मते मिळवत प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश लोखंडे यांचा पराभव केला. लोखंडे यांना केवळ १३५ मते मिळाली. तिसऱ्या स्थानी राहिलेले अपक्ष उमेदवार इसाक संदू खान यांना केवळ ३५ मतांवर समाधान मानावे लागले. तर पाच मते अवैध ठरली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निकाल जाहीर केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण केली तसेच फटाक्याची आतषबाजी केली. तसेच क्रांती चौकापर्यंत विजयी मिरवणूकदेखील काढण्यात आली. निवडणूक निरीक्षक संजय कोलते, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी आठला या मतमोजणीला चार टेबलवर सुरवात झाली. दोन्ही जिल्ह्यातील ६३७ मतदारांपैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. या ६३० पैकी पाच मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी ३१३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.
पहिल्या फेरीतच शिरसाठ यांनी विजयासाठी मतांचा कोटा पार करत ४५५ मते प्राप्त केली. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार लोखंडे यांना १३५ मतांवर तर अपक्ष सांडू खान यांना ३५ मतांवर समाधान मानावे लागले.