Murder Of Ketan Agrawal At Lohgad The End Of An Obstacle In Love
केतन अग्रवालचा खूनच
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
सिया गोयल आणि केतन अग्रवाल यापूर्वीही तीन ते चार वेळा लोहगडावर गेले होते. अग्रवाल आणि गोयल कुटुंबीयांनी १९ जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन आखले होते. तिला तिकडे जायचे नव्हते. त्यामुळे तिने १८ जूनला लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला आणि केतनला तिकडे घेऊनही गेली.
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून, पूर्वनियोजित कटातून घडवून आणलेला खून असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी केतनची हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सिया प्रवीण गोयल (२०, रा. लीलाकुंज, गंगाधामसमोर, बिबवेवाडी) आणि सियाचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (२२, रा. पार्श्वनगर, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस फिरताना पाय घसरून केतन दरीत पडल्याचे सांगितले होते. ही घटना १८ जूनला घडली होती. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. यात सिया व चेतन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. फेब्रुवारीत सिया आणि केतनचा साखरपुडा झाला होता; पण तिला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे केतन हा त्यांच्या नात्यातील अडथळा ठरत असल्याने त्याला संपविण्याचा कट रचला, अशी माहिती गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ व ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.