आनंदसरींची प्रतीक्षा अखेर संपुष्टात...

महाराष्ट्र टाइम्स
आनंदसरींची प्रतीक्षा अखेर संपुष्टात...
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने महिनाअखेर जवळ येऊनही पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग दाटून आले असताना, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरात काळे मेघ दाटून आले आणि काही क्षणांतच धो-धो पावसाला सुरुवात झाली. मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे नाशिककरांची तारांबळ झाली असली तरी, महिनाभरापासून आकाशाकडे चातकासारखी नजर लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.

पाऊस लांबल्यामुळे जिल्हाभरात सर्वदूर टँकर सुरू झाले असून, शहरावरही आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीची वेळ आली आहे. मंगळवारी दुपारी शहरात अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पंचवटीसह सिडको, कामटवाडे, पाथर्डी, सातपूर आदी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चांदवडमध्ये ३०.६, त्र्यंबकेश्वरमध्ये २५.९, नांदगावात २१.७ मिमी पाऊस नोंदविला गेला. कमी-अधिक फरकाने सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. दिवसभरात इगतपुरी, निफाड, चांदवड यांसह काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात मागील २४ तासात ३. ५ मिमी, धुळे जिल्ह्यात १.५ मिमी तर नंदुरबार जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली.
शहरभरात रस्तोरस्ती साचलेल्या पाण्यामुळे वरुणराजाच्या सलामीनेच नाशिककरांची ‘नाकाबंदी’ केल्याचा प्रत्यय आला. शहरासह उपनगरांतील मुख्य रस्त्यांवर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या ठिकाणी तळी साचल्याने रस्त्यांवर चिखल, खडी पसरल्याने शहरात जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनकोंडीत अडकलेल्या वाहनधारकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.सविस्तर वृत्त...प्लस १