रत्नागिरी शहरालामिळणार जादा पाणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ratnagiri city to get more water renovation of panwal dam
चिपळूण : रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानवल धरणाचे मजबूतीकरण आणि नूतनीकरणाचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे विशेष स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत केवळ २० लाख लिटर पाणीपुरवठा होत असे. आता तो ७५ लाख लिटरवर जाणार आहे.

‘शैक्षणिक सवलतींची
अंमलबजावणी करा’

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत पाच जून रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. उपसमितीची बैठक मंगळवारी विधान भवनात आयोजित करण्यात आली होती.

आजीच्या देवघरात

नातवाकडून चोरी

सिन्नर : दोडी बुद्रुक (जि. नाशिक) येथील भामाबाई काशीनाथ शिंदे यांच्या देवघरातील चांदीचा मुखवटा त्यांच्याच नातवाने चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आजी काही वेळासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधून नातू कार्तिक भीमा शिंदे (२३) याने ही चोरी केली होती. वावी पोलिसांच्या तपासात या चोरीचा छडा लागला.

दाम्पत्याला लुटले

सातारा : कारमधून पुण्याकडे निघालेल्या दाम्पत्याला लोणंद बायपास परिसरात रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास लुबाडण्यात आले. भाग्यश्री वैभव खोपडे (रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची सोन्याची साखळी चोरट्यांनी हिसकावली. नैसर्गिक विधीसाठी वैभव खोपडे यांनी कार लोणंदच्या अलीकडे रस्त्यावर थांबवली होती. चोरट्यांनी दगडाने कारच्या खिडकीच्या काचा फोडून भाग्यश्री यांचे दागिने हिसकवले. एका दुचाकीस्वाराने मदत केल्यामुळे खोपडे दाम्पत्याने लोणंद पोलिसात तक्रार दिली.

अपघातात तिघे ठार

जळगाव : पाळधी (ता. धरणगाव) परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकींवरील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८), चेतन पाटील (वय ३५) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात बाबूलाल राक्षे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदारांचा शपथविधी

मुंबई : विधान परिषदेतील १६ नवनिर्वाचित सदस्यांना मंगळवारी सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यात प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांचा समावेश आहे.