शहरात सायंकाळनंतर बरसल्या पावसाच्या सरी

Contributed byम. टा. प्रतनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शहरात सायंकाळनंतर बरसल्या पावसाच्या सरी
दिवसभर ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी संध्याकाळी पुणे शहरात पावसाच्या सरी बरसल्या. काही भागांत दुपारपासूनच हलक्या सरी पडायला सुरुवात झाली होती. मात्र, सायंकाळी, सातच्या सुमारास शहराच्या बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली आणि रात्री उशिरापर्यंत रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या.

लोहगाव परिसरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संध्याकाळच्या वेळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भिजतच प्रवास करावा लागला. काही ठिकाणी वाहतूकही संथ झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शहराच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारी कमाल ३०.७, तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, नैर्ऋत्य मान्सूनने राज्यात आणखी प्रगती केली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग व्यापले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्याच्या उर्वरित भागांतही प्रगती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे ‘आयएमडी’ने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरासह मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाटमाथा आणि जिल्ह्यातील काही भागांत तुलनेने अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील आर्द्रता आणि मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण पुढील चार दिवसांत वाढेल, असा अंदाज हवामानशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संबंधित वृत्त... ८