‘आपला दवाखाना’च्या निधीला लावली कात्री

महाराष्ट्र टाइम्स

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी 'आपला दवाखाना' योजनेच्या निधीत कपात झाली आहे. २०२४-२५ मध्ये १९१.११ कोटी खर्च झाला होता, तर २०२५-२६ मध्ये केवळ २८.९२ कोटी खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे शहरी भागातील गरीब आणि झोपडपट्टीवासीयांना आरोग्यसेवा मिळाली. जानेवारी २०२६ पर्यंत १०२.७७ लाख बाह्यरुग्णांना सेवा देण्यात आली.

apala davakhana scheme fund faces cuts investment in healthcare reduced

‘आपला दवाखाना’ या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या निधीला यंदा कात्री लावण्यात आली आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०२५-२६ या वर्षी अवघा २८.९२ कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सन २०२४-२५मध्ये या योजनेंतर्गत १९१.११ कोटी खर्च केला होता, असे या अहवालातून समोर आले आहे.

राज्याचा २०२४-२५चा आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला. या अहवालात वरील बाब समोर आली आहे. राज्यात शहरी भागात विशेषतः गरीब आणि झोपडपट्टीवासीयांना आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणली गेली. यात विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार राज्यात एकूण ६४५ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ स्थापित करण्यात आला. आपला दवाखाना योजनेंतर्गत जानेवारी २०२६पर्यंत १०२.७७ लाख बाह्यरुग्णांना सेवा पुरविण्यात आली. १३.६८ लाख प्रयोगशाळा तपासणी करण्यात आल्या. याशिवाय ४.९६ लाख गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.