तळेगाव श्यामजी पंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
चिस्तुर येथील लता मिसळे (४५) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करायचे असल्याने रुग्णवाहिका पाठवा, असे डॉ. रावेकर यांना भाजप च्या माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता होले यांनी फोन करून सांगितले. रुग्णवाहिका ही गर्भवती महिलांसाठी असल्याचे डॉ. रावेकर यांनी कळविले. यावर होले यांनी रुग्णाला आर्वीपर्यंत नेऊन नंतर दुसरी रुग्णवाहिका मागविणार असे सांगितले. यानंतर चिस्तुरला रुग्णवाहिका पाठविण्यात आली. यातच आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह परत नेत असताना तळेगावच्या भाजप पदाधिकारी आणि इतर चौघांनी डॉ. रावेकर यांना जबाबदार धरत मारहाण केली. यात प्रामुख्याने सचिन होले, अंकिता होले, नवाज शेख, राहुल बुले आणि इतर चौघांचा समावेश होता, अशी तक्रार डॉ. रावेकर यांनी दिली आहे.


