इंदापूर नगर परिषदेचा २०२६-२७ या वर्षाचा १७८ कोटी ४९ लाख ४५ हजार रुपये अपेक्षित महसुली, भांडवली जमा धरीत असलेल्या अर्थसंकल्पाला कोणतीही करवाढ न करता सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, अशी माहिती नगराध्यक्ष भरत शहा व मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष भरत शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय विशेष सभा पार पडली. या वेळी उपनगराध्यक्ष शैलेश पवार, गटनेते शकील सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यासह नगरसेवक, नगर परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वेळी २०२५-२६ या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. नियमानुसार महिला बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, तसेच क्रीडा महोत्सव यासाठी विशेष राखीव निधीची तरतूद करण्यात आली. या वेळी कोणतीही करवाढ नसलेला ७४ लाख ७२ हजार ६८६ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये मागील वर्षाची शिल्लक १ कोटी १७ लाख ५४ हजार ८६ होती. तर २०२६-२७ मध्ये अंदाजे महसूली व भांडवली अशी एकूण १७८ कोटी ४९ लाख ४५ हजार रुपये अपेक्षित जमा धरण्यात आलेली आहे. तर महसूली व भांडवली खर्च १७८ कोटी ९२ लाख २६ हजार ४०० रुपये अपेक्षित धरण्यात आलेला आहे. इंदापूरसाठी नवीन भुयारी गटार योजना, तसेच रस्ते प्रकल्प योजना मंजूर असून, त्या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प. संगणकीकरण यासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने तरतूद, शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार विचारात घेऊन, प्रस्तावित शहर विकास आराखडा विचारात घेऊन नवीन रस्ते, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तरतूद करण्यात आली.


